ओळख
“अरे, तुम्ही मराठी आहात ना? मग मराठीत बोला की!”
आई म्हणाली. नेहमीसारखं. तेव्हा मी लहान होतो. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं हा शिस्तीचा भाग वाटायचा. तिचं प्रत्येक वाक्य म्हणजे “शिस्त लावण्यासाठी ओरडणं” असं समजायचो. पण का म्हणायची ती हे, हे समजायला खूप उशीर झाला.
त्या वेळी हे सगळं फारस महत्त्वाचं वाटलं नव्हतं.
पण आता, वर्षांनंतर, जेव्हा मी हा ब्लॉग मराठीत लिहितोय, तेव्हा कुणालाही आश्चर्य वाटेल. “आयुष सावंत चक्क मराठीत लिहितोय?” हो, उशीर झाला असला तरी अखेर समजलंय.
एक सवय, जी कधी नकळत लागली आणि नंतर वाढत गेली – ती आता हळूहळू सुधारतोय. माफ करा, मध्येच काही इंग्रजी शब्द आले तर. नव्याने सुरुवात करतोय…
मला अजून आठवतंय, साधारण ७-८ वर्षांचा असेन. उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट हा नित्यक्रम असायचा. सकाळी उठल्यावर थेट मैदानावर धावायचं, बॅट उचलायची, आणि जोपर्यंत उन्हाचा कडाका असह्य होत नाही, तोपर्यंत खेळत राहायचं.
त्या दिवशीही तसंच झालं. खेळून दमलो होतो, गळ्याला घामाच्या धारा लागल्या होत्या. आम्ही शाळेच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसलो होतो.
तेवढ्यात, एक मित्र ओरडला –
“चलो भाई लोग, मेरे घर प्लेस्टेशन खेलते हैं!”
मी क्षणभर विचार केला. घरी जाऊन आंघोळ करणं आवश्यक होतं. म्हणून मी सहज बोलून गेलो – “मैं आंघोळ करून आता हूँ!”
त्या एका वाक्यात हिंदी आणि मराठी एकत्र गुंफलं गेलं होतं. माझ्या मित्रांनी ते ऐकल्या ऐकल्या हसण्याचा एकच स्फोट केला.
माझी मस्करी करत त्यातल्या एका मित्राने नकळत चिडवलं – “अबे, तुझी भाषा तरी एक कर रे!”
तो हसत होता, बाकी सगळेही हसले, आणि मीसुद्धा. पण त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं.
तेव्हा काहीच वाटलं नाही. पण आज मागे वळून पाहताना कळतंय – तो एक क्षण होता, ज्याने नकळत माझ्या मनात एक विचार पेरला. “सगळे हिंदी बोलतात, म्हणजे मलाही हिंदीतच बोलायला हवं…”
शाळा इंग्रजी-माध्यमाची होती. त्यामुळे तिथे मुख्यतः हिंदी आणि इंग्रजीतच बोलायचं व्हायचं. सोसायटीतले मित्रही हिंदीतच बोलायचे.
घरात मात्र मराठी सुरू असायची, पण बाहेर ती कुठेच ऐकू यायची नाही. कधी शाळेत, कधी मैत्रीत, कधी शहरात – कुठेच. त्यामुळे नकळत मराठी ही फक्त घरात बोलायची भाषा बनली.
हळूहळू मी मराठीत कमी आणि हिंदी-इंग्रजीत जास्त बोलायला लागलो. त्या वेळी काहीच जाणवलं नाही. पण आता जाणवतंय – मी माझ्याच भाषेपासून लांब जात होतो.
२००९ मध्ये आई-बाबांनी मला “मी शिवाजी राजे बोलतोय” हा सिनेमा दाखवायला नेलं. मी फक्त दहा वर्षांचा होतो.
चित्रपट सुरु झाला आणि मी त्यात पूर्णपणे हरवून गेलो. एका क्षणी महेश मांजरेकर (जो चित्रपटात शिवरायांच्या आत्म्याच्या रूपात दिसतो) एका संवादात म्हणतो –
“अरे, स्वाभिमान गहाण टाकून कोण जगतं रे?”
त्या एका वाक्याने मनाचा ठाव घेतला. तोपर्यंत भाषा ही फक्त बोलण्याचं माध्यम आहे असंच वाटायचं.
पण त्या चित्रपटाने पहिल्यांदा शिकवलं – “आपली भाषा म्हणजे आपली ओळख आहे. जर आपणच तिचा अभिमान बाळगला नाही, तर दुसऱ्या कुणाला तिची किंमत कळेल?”
त्या एका सिनेमा नंतर गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या.
मी मोठा होत गेलो. आई, मावशी, मामा – सगळे मला नेहमीच मराठीत बोलायला सांगायचे. त्यांचा हेतू चांगला असला तरी मी त्याला फारसं गांभीर्याने घेतलं नाही.
2017 मध्ये COEP ला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला, आणि तिथेच माझ्या दृष्टिकोनात मोठा बदल घडला.
तिथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून विद्यार्थी आले होते. प्रत्येक जण आपल्या मातृभाषेत बोलायचा – आणि मी? मराठी मित्रांसोबतही हिंदी किंवा इंग्रजीत संवाद साधायचो!
हळूहळू लक्षात यायला लागलं – “मी कुठेतरी चुकलोय!” त्या दिवसापासून मी मराठीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली.
गेल्या दीड-दोन वर्षांत अमेरिकेत राहून हे जास्तच प्रकर्षानं जाणवलं – “इथं आपली संस्कृती टिकवायची असेल, तर आपणच तिची जबाबदारी घ्यायला हवी!”
इथले गुजराती, तेलुगु, तामिळ लोक – आपल्या भाषेत बोलतात, आपली संस्कृती जपत असतात. फक्त मराठी माणसं मात्र इंग्रजीत बोलण्यात धन्यता मानतात.
मग वाटलं – “आपणच आपल्या भाषेचा अनादर करतोय.” जर आपणच आपली संस्कृती, आपली भाषा, आणि आपली माणसं जपली नाहीत, तर दुसऱ्या कुणीही जपणार नाही.
गेल्या १० वर्षांत मी मराठी सिनेमे, गाणी, साहित्य – सगळं पुन्हा नव्याने अनुभवायला लागलो. हे सगळं एका उद्देशाने – फक्त आणि फक्त मराठीसाठी.
मला कळलं, महाराष्ट्राच्या मातीने या देशाला किती मोठी योगदानं दिली आहेत. मग आपणच का लाजायचं?
आज मी जाणीवपूर्वक एक संकल्प केला आहे – मी कुठल्याही मराठी माणसाशी हिंदी किंवा इंग्रजी बोलणार नाही. मराठीत बोलतो, अभिमानाने बोलतो!
मला आनंद होतोय की आज मराठी माणसं जागरूक होत आहेत. आपली संस्कृती आणि भाषा जपण्यासाठी पुढे येत आहेत.
आपण विसरू नये – आपण शिवरायांच्या भूमीत जन्मलो आहोत! आपणच आपली भाषा जपली नाही, तर इतर कुणीही जपणार नाही.
म्हणूनच, मी अभिमानाने म्हणतो – “लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी!”
जय हिंद, जय महाराष्ट्र !!